शेतांत किड, रोग किंवा तणांचे नियंत्रण करण्यासाठी शेतकरी विविध रासायनिक औषधे फवारतात. ही रासायनिक औषधे फवारतांना मुख्यत: ३ प्रकारचा धोका निर्माण होऊ शकतो.
रासायनिक औषधांचे अत्यंत बारिक कण हवेबरोबर श्वासोच्छासासोबत शरीरात जातात.
फवारणी करीत असतांना त्वचेच्या संपर्कामधून तथा डोळ्यांद्वारे शरीरात जातात.
फवारणी करतांना नकळत तोंडाद्वारे खातांना, बीडी पीतांना शरीरात जाऊ शकतात.
किटकनाशके वापरतांना सर्वसाधारणपणे घ्यावयाची काळजी
गळके फवारणी यंत्र न वापरता ते दुरुस्त करुन वापरावे.
किटकनाशके फवारणी यंत्रात भरतांना सांडू नये यासाठी नरसाळ्याचा (चाडीचा) वापर करावा.
तणनाशके फवारणीसाठी वेगळा पंप वापरावा व तो पंप किटकनाशके वापरताना संरक्षक कपडे वापरावेत.
फवारणीसाठी वापरलेले सर्व साहित्य पाण्याने स्वच्छ धुवुन ठेवावेत.
झिजलेले, खराब झालेले नोझल्स बदलून घ्यावेत.
किटकनाशकाला हुंगणे किंवा त्याचा वास घेणे टाळावे.
फवारणीचे मिश्रण हाताने न ढवळता लांब दांड्याचा किंवा काठीचा वापर करावा.
किटकनाशके पोटात जाण्याची शक्यता असल्याने फवारणीचे मिश्रण करतांना अथवा फवारणीच्या वेळी तंबाखु खाणे अथवा धुम्रपान करणे टाळावे.
फवारणीचे काम पुर्ण झाल्यावर हात साबणाने स्वच्छ धुवुन खाणे-पिणे करावे.
फवारणीचे वेळी लहान मुले, जनावरे, पाळीव प्राणी यांना त्या ठिकाणा पासून दुर ठेवावे
उपाशीपोटी फवारणी न करता फवारणीपुर्वी न्याहारी करावी
फवारणी करतांना वापरलेली भांडी इ.साहित्य नदी, नाला किंवा विहीरीजवळ धुवु नयेत, तर धुतांना वापरलेले पाणी त्यात विषारी अवशेष असल्याने पडीक जमिनीत टाकावेत अथवा मातीत गाडावे.
किटकनाशकांच्या रिकाम्या बाटल्या वापरानंतर नष्ट करुन टाकाव्यात..
फवारणी करतांना नोझल बंद पडल्यास ते स्वच्छ करण्यासाठी तोंड लावुन फुंकु नये अथवा हवा तोंडाने आत ओढु नये यासाठी सोयीस्कर तार, काडी किंवा टाचणी वापरावी.
किटकनाशके फवारण्याचे काम दर दिवशी आठ तासापेक्षा जास्तवेळ करु नये. हे काम करणा-या प्रत्येक व्यक्तीने ठराविक कालावधीने डॉक्टराकडून स्वत:ला तपासून घ्यावे.
किटकनाशके अंगावर पडू नये म्हणून वा-यांच्या विरुध्द दिशेने फवारणी करु नये.
किटकनाशके मारलेल्या क्षेत्रावर गुरांना चरण्यास किमान दोन आठवडे जावू देऊ नये.
जमिनीवर सांडलेले किटकनाशक हातंनी न पुसता व त्यावर पाणी न टाकता ती माती/चिखल यांच्या साह्याने शोषुन घ्यावेत व जमिनीत गाडुन टाकावीत.
डब्यावरील मार्गदर्शक चिन्हाकडे काळजीपुर्वक लक्ष द्यावे.
लाल रंगाचे चिन्ह/खुणा असलेली औषधी विषारी असुन त्यानंतर पिवळा, निळा व हिरवा असा क्रम लागतो.
विषबाधा झाल्याची लक्षणे व उपाययोजना
विषबाधा ही किटकनाशके/तणनाशके यांचा त्यांचेशी संपर्क अथवा पोटत गेल्यास होते.
विषबाधा व इतर आजार यांच्या लक्षणात बरेचदा साम्य राहू शकते.
किटकनाशके/तणनाशके डोळ्यांत उडाल्यास, तात्काळ डोळे स्वच्छ पाण्याने ५ मिनीटापर्यंत पाण्याची धार सोडुन धुवावे.
शरीरावर उडाले असल्यास १० मिनिटे साबणाने स्वच्छ धुवावे व दवाखान्यात न्यावे.
विषबाधेनंतर रोगी जर संपुर्ण शुध्दीवर असेल तरच उलटी करण्यास प्रवृत्त करावे अन्यथा नाही व ३ चमचे बारीक लाकडी कोळसा भुकटी करुन अर्धा ग्लास पाण्यातुन पाजा व लगेच दवाखान्यात न्या.
विषारी औषध कपड्यांवर उडाले असल्यास ते कपडे लगेच बदला व रोग्यास शक्य तितक्या लवकर दवाखान्यात पोहचवा.